राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालाबाबत भाष्य केले आहे.
मला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या कोट्यामध्ये काही फरक पडलेला नाही. फक्त एक मत त्यांना जादा पडले आहे आणि ते कुठून आले मला ठाऊक आहे. ते महाविकास आघाडीचे नाही,” असे शरद पवार म्हणाले.
सहावी सीट शिवसेनेने लढवली. तिथे आमची गॅप फार होती. मतांची संख्या कमी होती. पण धाडस केलं आणि प्रयत्न केला. त्या प्रयत्नात अपक्षांची संख्या भाजपकडे अधिक होती. आमच्याकडे कमी होती. तरीही दोघांना पुरेशी इतकी मते नव्हती. त्यामुळे भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे आमदार होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्यात त्यांना यश आलं. त्यामुळे हा फरक पडला. नाही तर आघाडीच्या संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालं आहे. त्यात वेगळं काही नाही. एकंदर जो चमत्कार झाला आहे. विविध मार्गाने माणसं आपल्या बाजूने करण्यात फडणवीसांना यश आलं हे मला मान्य केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.






