अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून गेल्या २४ तासांत राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची नोंद झालीये. कोकण ,मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात शनिवारी मुसळधार ते मध्यम पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. तर पुढील ४८ ते ७२ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलाय.
आज विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो दक्षिण कर्नाटकापर्यंत आहे. तसेच आज उत्तर बंगाल उपसागराच्या किनाऱ्यावर चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच परिसरात येत्या ४८ तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात ४ तारखेनंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. आज आणि उद्या म्हणजे ३ आणि ४ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात, तर ४ आणि ५ सप्टेंबरला मराठवाड्यात, ५ आणि ६ तारखेला विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे, यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय.
पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील ५ ते ६ दिवस ढगाळ वातावरण असेल. तसेच हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या परिसरात २ आणि ३ सप्टेंबरला घाट विभागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून येथे येलो अलर्ट देण्यात आलाय. शनिवारी दिवसभरात कोल्हापूर, रायगड, सांगली, पुणे या जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. राज्यात २४ तासात लोणावळा येथे १०५ मिमी, तर चिंचवड येथे ८३ मिमी पावसाची नोंद झालीय.