अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-भाजपशी हातमिळवणी केली. 35 ते 40 आमदारांचा पाठिंबा घेऊन थेट सरकारमध्येही सहभागी झाले. अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर अन्य 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या फुटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एक नवा अध्याय सुरु झाला आहे. काल कराड येथे बोलताना शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना जागा दाखवून देणार असल्याचं सांगत राष्ट्रवादीमध्ये आता नवं नेतृत्व तयार करणार असल्याचं स्पष्ट केलं. पवार यांच्या याच वक्तव्यानंतर रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. स्वतः शरद पवार हे देखील त्यांना पक्षाचा तरुण चेहरा म्हणून प्रमोट करताना दिसत आहेत. रविवारी पुण्यातील मोदीबाग येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी रोहित पवार यांना शेजारी बसण्यास सांगितले. रोहित पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत.






