कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीत उभे राहणार नसल्याची घोषणा केली आहे. राज्यसभेसाठी माझ्या उमेदवारीला पाठिंबा नाकारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.
आमच्यात राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत सर्व चर्चा झाली होती. सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तबही झाले होते. मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला. या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटत आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे आणि माझ्यात काय संभाषण झाले, हे मला जाहीर करायचे नव्हते. पण मला आज बोलावे लागतेय. मी सांगतोय त्यापैकी एकही शब्द खोटा असेल तर मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवछत्रपतींच्या कोणत्याही स्मारकावर यायला तयार आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, मी खोटं बोलत आहे, असे आव्हान संभाजीराजे यांनी दिले. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले.