Sanjay Raut , गेट वेल सून! भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची बोचरी प्रतिक्रिया

0
730

मुंबई: संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, असं म्हणणंच धाडसाचं ठरेल. कारण पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण होते, ते इथे नव्हतंच. त्यामुळे हा एकपात्री प्रयोग बघणाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली असेल, असं म्हणतो. राजकारणात गती असलेल्यांच्या तर पोटात हसून हसून मुरडा आला असावा… अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
फेसबुक पोस्ट वर पाटील यांनी सांगितले की,
आरोप झाले, तर निर्दोषत्व सिद्ध करण्याचे अनेक घटनादत्त अधिकार आणि मार्ग आहेत. ते राहिले बाजूला, आरोप करणाऱ्याचं अतिशय असभ्य भाषेत चारित्र्यहनन करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता. राऊत यांची भाषा राजकीय सभ्यतेत बसणारी नव्हती. याचसाठी शिवसेनेनं राऊतांपासून सुरक्षित अंतर राखलं असावं.

शिवसेना भवनात राऊतांचा हा एकपात्री प्रयोग झाला, यापलीकडे यात शिवसेना कुठेच नव्हती. त्यामुळे राऊत मध्ये-मध्ये बाळासाहेब, शिवसेनेचं नाव ओढून-ताणून घेत होते. उद्धवजी तर दूरच, पण ज्या आदित्य ठाकरेंना पर्यावरणाचा हवाला देत प्रकल्पावर कारवाई करायला राऊतांनी सांगितलं, तेही तिथे नसावे?

एकूणात केंद्रीय तपास यंत्रणांकडून ज्यांची चौकशी झाली, त्यांचं अरण्यरूदन असा हा प्रकार होता. प्रयोग आणखी ‘नबाबी’ होण्यासाठी तुम्ही मित्रांची मदत घ्यायला हवी होती. कदाचित, नाशिकसारख्या दूरच्या ठिकाणांहून माणसं जमवता-जमवता ही जमवा-जमव जमली नसावी. असो. Sanjay Raut , गेट वेल सून!