मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महंत डॉ.नामदेव शास्त्री यांची प्रतिक्रिया

0
57

महंत नामदेव शास्त्री यांनी माध्यमांसमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला केलेले विधान तुटपुंज्या माहितीच्या आधारे केल्याचे म्हटले. परंतु देशमुख कुटुंबियांशी झालेल्या भेटीनंतर आपल्याला संपूर्ण घटनेची जाणीव झाल्याचे सांगितले. त्यामुळे लोकांनी गैरसमज करू नये असे आवाहन करत, न्यायालयाने देखील हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालून देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचे कारण सांगून अखेर आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. यावर आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिल्या दिवशी आपल्याला पूर्वकल्पना नसल्याचे महंत नामदेव शास्त्री यांनी सांगितले. “धनंजय देशमुख ज्यावेळी गडावर आले त्यावेळी त्यांनी मला या प्रकरणाविषयी जाण करून दिली. ज्यावेळी धनंजय देशमुख यांनी माझी भेट घेतली, मला सर्व घटना सांगितली त्यानंतर माझी भावना बदलली. भगवानगड हा देशमुख कुटुंबाच्या मागे आहे” असे त्यांनी सांगितले.

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्याचे फोटो प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड (Walmik Karad) याचा या घटनेशी संबंध असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या करिता विरोधकांनी रान पेटवले. त्यामुळे अखेर त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला.