नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पण, त्याआधी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांची यंत्रणा कामाला लागली आहे. सत्यजीत तांबे यांच्या पाठीशी कोण आहे, यावरून आता पडदा बाजूला झाला आहे. सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांचे स्टेट्स समोर आले आहे.विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांचे स्टेटस ठेवले आहे. विखे पाटलांच्या जनसेवा ऑफिसच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या स्टेटसवर विजयी भवं असं लिहिलं आहे. शेकडो कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर सत्यजीत तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांसह विखे पाटलांच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या स्टेटसवर सत्यजीत तांबे झळकले आहे. खासदार सुजय विखे यांनी रात्रीतून चमत्कार घडणार असं वक्तव्य केलं होतं. आता अहमदनगर जिल्ह्यातील भाजप सत्यजीत तांबेंच्या पाठीशी उभा राहिल्याचं स्पष्ट होतंय.