२०२४ च्या निवडणुकीत शिंदे गटातील बहुतांश आमदार भाजपचे ‘कमळ’ हातात घेणार

0
970

शिंदे गटातील नाराज आमदारांवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, “महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लवकरच ग्रहण लागणार आहे. शिंदे गटातील आमदारांमध्ये सध्या नैराश्याचं वातावरण निर्माण झालं आहे. सत्तांतर घडवून आपल्याकडून फार मोठी चूक झाली, मंत्रीपदाची स्वप्न दाखवली गेली, पण ती पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे आपला डाव कुठेतरी फसला असल्याची कबुली शिंदे गटाचे नेते आपल्या मतदारसंघात देत आहेत.

त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत शिंदे गटातील बहुतेक आमदार भारतीय जनता पार्टीच्या ‘कमळ’ निशाणीवर निवडणूक लढवतील की काय? अशी चर्चा त्या-त्या मतदारसंघात सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तांतराचा डाव फसला असून ज्या पद्धतीनं शिंदे सरकारने महाराष्ट्रात सत्ता काबीज केली, ते निश्चितच महाराष्ट्राला आवडलेलं नाही. त्यामुळे नाराज आमदार शिंदे गटाला सोडून भाजपात सामील होतील की काय? अशी चिंता एकनाथ शिंदे यांना पडली आहे, अशी प्रतिक्रिया तपासे यांनी दिली आहे.