Breaking…धनगर आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन, मंत्री राधाकृष्ण विखेंवर उधळला भंडारा…

0
26

राज्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं आहे. मराठा आंदोलक पेटलेले असतानाच आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला असून या आंदोलकांनी थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध नोंदवला आहे.

सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होत विखे पाटील आल्याची कुणकुण लागताच धनगर समाजातील आंदोलकांनी रेस्ट हाऊसकडे धाव घेतली. मंत्र्यांना निवेदन द्यायचं आहे. आम्हाला त्यांची भेट हवीय असं आंदोलकांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनीही त्यांचं म्हणणं विखे पाटील यांच्याकडे पोहोचवलं. तेव्हा विखे पाटील यांनी आंदोलकांना येण्याची परवानगी दिली.

हे कार्यकर्ते रेस्ट हाऊसमध्ये आले. कार्यकर्ते येताच विखे पाटील ऊठून उभे राहिले. त्यांना नमस्कार केला. आणि तुमचं काय म्हणणं आहे? अशी विचारणा केली. त्यावेळी धनगर समाजातील आंदोलक शेखर बंगाळे यांनी विखे पाटील यांना निवेदन दिलं. बंगाळे हा विखे पाटील यांच्या बाजूलाच उभा होता. विखे पाटील निवेदन वाचत असतानाच अचानक बंगाळे यांनी खिशात हात घातला आणि खिशातून पुडी काढत विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यामुळे विखे पाटील यांच्या अंगावर संपूर्ण हळद पसरली.