अमरवेल तण तुमच्या शेतातील सोयाबीनचे पूर्ण नुकसान करेल…वेळीच या पध्दतीने करा व्यवस्थापन

0
15

सोयाबीनसह अन्य पिकांना अमरवेल तणाचा मोठा धोका असतो. या तणाचे वेळीच निर्मूलन न केल्यास १०० टक्के नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. विदर्भातील सोयाबीनवर त्याचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. बिजोत्पादन अवस्थेपूर्वी वेळीच प्रतिबंधात्मक व निवारणात्मक उपाय करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय तण व्यवस्थापन संधोधन प्रकल्पाचे व्ही.व्ही. गौड यांनी दिला आहे.

दरवर्षी सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. मागील काही वर्षात अमरवेल परोपजीवी तणाचा प्रादुर्भाव द्विदलवर्गीय पिकांवर मोठ्या प्रमाणात वाढला. बाल्यावस्थेत ही वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर चिकटते व जमिनीपासून वेगळी होते. सूक्ष्म तंतूच्या मदतीने वनस्पतीमधील अन्नरस शोषून घेते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त वनस्पतीची वाढ खुंटत जाते. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते, असे गौड यांनी सांगितले. अमरवेलाचे बी २० वर्षांहून जास्त काळ जमिनीत जिवंत राहू शकते. त्यामुळे बीजोत्पादन अवस्थेपूर्वी त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. तिबंधात्मक उपाययोजनांमध्ये पेरणीसाठी प्रमाणित किंवा तणरहित बियाण्यांचा वापर, पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर, शेताच्या बांधावरील, रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतातील अमरवेल तण काढून गाडून अथवा जाळून नष्ट करावे, जमिनीची खोल नांगरणी करावी, जांभूळवाही देऊन उगवण अवस्थेतील तण नष्ट करावे, नियमित डवरणी व निंदण करून पीक तणरहित ठेवावे, पिकांची फेरपालट करावी, प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये तृणवर्गीय पिकांची लागवड करावी आदींसह रासायनिक व्यवस्थापन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.