सुलतानपूर न्यायालयात आले असता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रामचेतच्या दुकानात थांबून त्यांच्याशी संवाद साधला. या व्यवसायातून किती पैसे मिळतात, याची विचारपूस केली. तसेच स्वतः हे काम करण्याचा सराव केला. राहुल गांधी यांनी स्वतःहून चप्पल दुरुस्त करतानाचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. राहुल गांधी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी रामचेत यांना चप्पल आणि बुट शिवण्यासाठी एक यंत्र भेट देण्यात आले.
रामचेत म्हणाले, “राहुल गांधी यांनी दुरूस्त केलेल्या चप्पल आणि बुटासाठी काही लोकांनी मला फोन केले. या बुटासाठी ते १० लाखांपर्यंत मोबदला देण्यासाठी तयार आहेत. काही जणांनी ५ लाखांपासून सुरूवात केली आणि १० लाख रुपये देऊ असे सांगितले. एकाने तर बॅग भरून पैसे देईल, असेही सांगितले. पण मी सर्व ऑफर फेटाळून लावल्या. मला या चप्पल आणि बुट विकायच्या नाहीत.” माध्यमांनी याचे कारण विचारले असता ते गमतीत म्हणाले की, राहुल गांधी आता माझे व्यावसायिक भागीदार आहेत. आम्ही एकत्र येऊन व्यवसाय करत आहोत.






