एकीकडे पोटनिवडणूक जाहीर आणि दुसरीकडे चिन्हाची लढाई जोरात. ठाकरे आणि शिंदे गटाच्या लढाईत आता 7 ऑक्टोबर ही तारीख निर्णायक ठरणार आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना 7 ऑक्टोबरपर्यंत आपली बाजू मांडायला सांगितलं आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस चिन्हाच्या लढाईत महत्त्वाचे ठरणार आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार शिंदे गटाचा आहे की भाजपचा याने काही फरक पडणार नाही. शिंदे गटाने विरोध केल्याने धनुष्यबाण ठाकरे गटाला मिळणार का हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. चिन्हाची केस आयोगाच्या दारात होईपर्यंत मध्येच निवडणूक जाहीर झाली की अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलं जातं हा आजवरचा इतिहास आहे. पण सध्याच्या केसमध्ये दोन्ही गटाचा दावा वेगवेगळा आहे.
ठाकरे गटाचा दावा-चिन्हाची केस मुळात आयोगासमोर अजून नीट आलेलीच नाही. अजून दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीर होतानाचीच स्थिती आयोगाला कायम ठेवावी लागेल. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल.
शिंदे गटाचा दावा- तर शिंदे गटाचं म्हणणं आहे की विधीमंडळ पक्षातला आमचा दावा आयोगासमोर पोहचला आहे. लोकसभा, विधानसभेत आमच्या गटाला अधिकृत मान्यता आहे. ठाकरे गट वेळकाढूपणा करुन चिन्ह टिकवू पाहत असलं तरी आमच्या तक्रारीची दखल घेत अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलंही जाऊ शकतं. 7 तारीख का महत्त्वाची- आता या लढाईत 7 तारीख ही दोन अर्थांनी महत्त्वाची आहे. 7 तारखेलाच पोटनिवडणुकीचं नोटिफिकेशन निघतंय. म्हणजे त्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा आहे. तर दुसरीकडे त्याच दिवशी आयोगातली कागदपत्रं सादर करण्याची मुदत. त्यामुळे चिन्हाबाबत काही निर्णय होऊ शकेल का याची उत्सुकता आहे.






