शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; अवकाळीबाबत हवामान खात्याची मोठी अपडेट

0
27

गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने तडाखा दिला. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होईल, याची वाट शेतकरी पाहत असताना दुसरीकडे आणखीच चिंता वाढवणारी बातमी आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात अवकाळीचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा धोका आहे. तर काही ठिकाणी गारपीटीची देखील शक्यता आहे. शेतकऱ्यांनी खरीप तसेच रबी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, आज म्हणजेच शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा सरी कोसळण्याची शक्यता आहे. उर्वरीत ठिकाणी दिवसभर ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे.

अवकाळीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. अशातच मराठवाडा आणि विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.
पुढील २४ तास मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्रातही दोन दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पावसामुळे तापमानात घट होणार आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात २-३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे . काही ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे.