अहमदनगर- सोलापूर महामार्गावर अपघातात दोघे जागीच ठार

0
20

नगर- सोलापूर महामार्गावरील बनपिंप्री शिवारात ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील बाळासाहेब लक्ष्मण बोरुडे (वय ५५) व बबन तरटे (वय-६०, दोघे रा. घोगरगाव, ता.श्रीगोंदा) हे दोघे जागीच ठार झाले. बुधवारी (दि.३१) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, घोगरगाव येथील रहिवासी असलेले बाळासाहेब बोरुडे व बबन तरटे हे दोघे नगरला कामानिमित्त आले होते.सायंकाळी चारच्या सुमारास नगर- सोलापूर महामार्गाने नगरहुन घोगरगावच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. धडक जोराची बसल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी श्रीगोंदा पोलिसांचे पथक तात्काळ दाखल झाले. दोघांचे मृतदेह श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

या अपघाताची माहिती समजताच संपूर्ण घोगरगाव गावावर शोककळा पसरली होती. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.