केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर कोणताही परिणाम होणार नाही. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निवडणूक आयोगाच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. गेल्या १० वर्षात पहिल्यादांच निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षित नव्हता. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होईपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय द्यायला पाहिजे नव्हता, असं मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
उल्हास बापट यांनी सांगितलं, “सरन्यायाधीशांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोग स्वतंत्र असून, ते निर्णय घेऊ शकतात. मात्र, निवडणूक आयोगाने निर्णय देताना प्रगल्भता दाखवायला हवी होती. कारण, आपण दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला, तर त्यांचा निर्णय रद्द होता. तेव्हा आयोगाने निर्णय देण्याची घाई केली आहे.”