शेतात जनावरांसाठी कुट्टी करत असताना कडबा कुट्टी मशीन मध्ये साडी अडकल्याने ३४ वर्षीय महिला गंभीर जखमी होऊन मयत झाल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी शिवारात असलेल्या शिरकाण मळा येथे गुरुवारी (दि.८) सकाळी १० च्या सुमारास घडली.
अलका रामकृष्ण सुरकुंडे (वय ३४, मूळ रा. माहूर, जि. नांदेड, हल्ली रा. शिरकाण मळा, वाळकी येथील नानासाहेब अर्जुन कासार यांच्या शेतात) असे या मयत महिलेचे नाव आहे. सदर महिला व तिचे कुटुंब मजुरी साठी नांदेड हून नगर तालुक्यात आलेले असून शेतात मजुरी करत आपली उपजीविका भागवत आहे. गुरुवारी (दि.८) सकाळी १० च्या सुमारास त्या शेतात जनावरांसाठी कडब्याची कुट्टी करत होत्या. अचानक त्यांची साडी कुट्टी मशीन मध्ये अडकल्याने त्यांना मार लागून मोठी दुखापत झाली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांची बहिण लता श्रीरंग बेल्हे हिने व नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्या मयत झाल्याचे मेडीकल ऑफिसर डॉ. कोल्हे यांनी घोषित केले.
याबाबतची माहिती जिल्हा रुग्णालयातील दवाखाना डयूटीवर असलेले तोफखाना पोलिस ठाण्याचे स.फौ. जठार यांनी नगर तालुका पोलिसांना दिली. तालुका पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.काँ. एस.बी. थोरात हे करीत आहेत.