भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबईत आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली. चर्चेनंतर माधुरी दीक्षित भाजपच्या तिकीटावर लढणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.
अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेत भाजपकडून मुंबईतून माधुरी दीक्षित, जळगावमधून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, पुण्यातून सुनील देवधर आणि धुळ्यातून प्रतापराव दीघावकर यांना तिकीट देण्यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या चारही जणांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत.






