व्यंकटेश मल्टीस्टेटच्या दशकपूर्ती लोगोचे अनावरण
समाजात अर्थसाक्षरता निर्माण व्हावी तसेच सर्वसामान्यांना आर्थिक पत देण्याच्या उदात्त हेतून कार्यरत असलेल्या व्यंकटेश मल्टीस्टेटने दहा वर्षे पूर्ण केली आहेत. दशकपूर्तीचा हा प्रवास अनेकांच्या आयुष्यात नवी उमेद घेवून आला. अनेकांना आपली संपन्नतेची स्वप्ने साकार करता आली. बुलंद भारताची निर्मिती हे संस्थेचे ध्येय खऱ्या अर्थाने समाजाला भरभरुन देणारे आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते तथा व्यंकटेश ग्रुपचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर सुबोध भावे यांनी केले.
व्यंकटेश मल्टीस्टेटच्या दशकपूर्ती लोगोचे अनावरण सुबोध भावे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यंकटेश ग्रुपचे चेअरमन अभिनाथ शिंदे, सह संस्थापक कृष्णा मसुरे,सहसंस्थापक व्यंकट देशमुख, सहसंस्थापक अनिल गुंजाळ, मार्केटिंग ॲण्ड डेव्हलपमेंट हेड ज्ञानेश झांबरे आदी उपस्थित होते.
अभिनाथ शिंदे यांनी सांगितले की, व्यंकटेश मल्टीस्टेटची सुरुवात 10 बाय 10 च्या कार्यालयात झाली. आम्ही सगळे नवीन होतो. कोणताही पूर्वानुभव नव्हता. त्यामुळे सगळीकडून नकारात्मक प्रतिक्रिया येत होत्या. आम्ही ध्येय निश्चित केल्यावर प्रत्यक्ष कृती केली होती. त्यामुळे आमचा आमच्यावर विश्वास होता. नकारात्मक वातावरणातही आम्ही प्रवास चालू ठेवला. चढउतार पाहिले. एक एक पायरी चढत आज शिखरापर्यंत पोहचलो आहोत. या काळात आम्ही सर्वात मोठी कमाई कोणती केली असेल तर ती म्हणजे लोकांचा विश्वास. आम्ही सतत लोकांच्या संपर्कात राहिलो. त्यांना विश्वास दिला. मल्टीस्टेटची स्थापना केली तेव्हा 10 ते 12 जणांना रोजगार मिळायला हवा असे ध्येय ठेवले. प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली तेव्हा कळलं या क्षेत्रात आपण खूप मोठी भरारी घेवू शकतो. दहा बारा नव्हे तर हजारो लोकांना रोजगार देऊ शकतो, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो. एक एक पायरी चढत व्यंकटेश ग्रुपने मोठी झेप घेतली. आज त्या छोट्या ध्येयातून एक मोठा उद्योग समूह उभा राहिला आहे. या वाटचालीत अनेक सभासद जोडले. संस्थेच्या यशस्वी वाटचालीत माझे सर्व सहकारी तसेच अधिकारी, कर्मचारी आणि खातेदारांचा सिंहाचा वाटा आहे.
अनिल गुंजाळ यांनी आभार मानले.






