नगर – भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात १४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर कल्याण रोड वर सीना नदीच्या पुलापासून जवळच असलेल्या दिनेश हॉटेल समोर बुधवारी (दि. २२) सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
ऋषिकेश प्रवीण गोरे (वय १४, रा. श्रीकृष्णनगर, कल्याण रोड) असे मयत युवकाचे नाव आहे. ऋषिकेश हा बुधवारी (दि.२२) सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्णनगर येथून कल्याण रोडने नगर शहराकडे होंडा शाईन मोटारसायकल वर (क्र. एम एच १६ ए एन ७५५५) येत असताना दिनेश हॉटेल समोर नगर कडून कल्याणच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या मोटार सायकलला समोरून जोराची धडक दिली.
या धडकेने ऋषिकेश हा रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला असून याबाबत मयत ऋषिकेश चे मामा महादेव भैरवनाथ जगताप (रा. वाळकी, ता. नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.