Sunday, May 19, 2024

जेऊर ग्रामसभेतील ठरावाला केराची टोपली ग्रामस्थांमध्ये नाराजी

जेऊर ग्रामसभेतील ठरावाला केराची टोपली
ग्रामस्थांमध्ये नाराजी ; पोलीस क्षेत्राला जागा देण्याची मागणी
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर ग्रामसभेत घेण्यात आलेल्या ठरावाला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार जेऊर ग्रामपंचायत मध्ये समोर आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की २६ जानेवारी रोजी जेऊर गावची ऑनलाईन ग्रामसभा संपन्न झाली होती. सदर ग्रामसभेत चर्चेतून विविध ठराव मंजूर करण्यात आले. परंतु ग्रामपंचायत कार्यालयाकडून फक्त कागदोपत्री ठराव घेण्यात येत असून त्यावर पुढील कारवाई होत नसल्याचे चित्र गावामध्ये दिसून येत आहे.
२६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस दुर क्षेत्राला मोजणी करून जागा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. जेऊर परिसरामध्ये ‘सरकार’ नावाचा ७/१२ उतारा निघत असलेल्या दोन जागा असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे. यापैकी एक जागा पोलिस दूर क्षेत्राला तात्काळ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. परंतु एक महिना उलटून देखील येथील अधिकारी अथवा पदाधिकाऱ्यांनी याबाबत काहीही कारवाई केलेली नाही.
ग्रामसभेतील ठरावाबाबत ग्रामपंचायत कार्यालयाची भूमिका उदासीन असल्याचे दिसून येते. तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असणारे जेऊर गाव व येथून नगर औरंगाबाद महामार्ग गेल्याने वाढती गुन्हेगारी, अपघात यावर आळा बसण्यासाठी जेऊर गावात सुसज्ज असे पोलीस दूरक्षेत्र असणे गरजेचे आहे. तालुक्यात अनेक गावांना पोलीस दुरक्षेत्र मंजूर होण्यासाठी नागरिक मागणी, आंदोलने करत असतात. परंतु जेऊर गावासाठी पोलीस दूरक्षेत्र मंजूर असून जागेअभावी पोलिसांची परवड सुरू आहे.
पोलीस दूरक्षेत्राला जागा देण्याचा ग्रामसभेत ठराव झाल्यानंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक केले होते. पोलीस दूर क्षेत्राचा परिसरातील जेऊर, बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, धनगरवाडी, खोसपुरी, पांगरमल, मजलेचिंचोली, आव्हाडवाडी, शेंडी, पोखर्डी, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, मांजरसुंबा या गावांना तसेच महामार्गावर होणारे अपघात व रस्ता लूट यासाठी फायदा होणार आहे.
परंतु ग्रामपंचायत कार्यालयाच्या उदासीन भूमिकेमुळे पोलीस दूर क्षेत्राच्या जागेचा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. ग्रामसभेतील ठरावाला केराची टोपली दाखवणा-यांवर कडक कारवाई करण्याची तसेच पोलीस दूर क्षेत्राला तात्काळ जागा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

ग्रामपंचायतची उदासीनता ही शोकांतिका
ग्रामसभेत ठराव होऊन देखील ग्रामपंचायत कार्यालय पोलिस दूर क्षेत्राच्या जागेबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. गावात एवढे अतिक्रमण झालेले आहे. परंतु पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांच्या हितासाठी, गरजेचे असणा-या पोलीस दूर क्षेत्राला जागा देण्यास ग्रामपंचायत कार्यालयाकडून होत असलेली दिरंगाई निश्चितच निषेधार्थ आहे.
….. अविनाश तोडमल (सामाजिक कार्यकर्ते, जेऊर)

पोलीस खात्याची परवड
जेऊर पोलीस दुर क्षेत्राचे काम पुर्वी ग्रामपंचायत च्या जुन्या इमारतीतून सुरू होते. परंतु इमारत मोडकळीस आल्याने व तेथे अत्यावश्यक सुविधा नसल्याने ती जागा मोकळी पडली आहे. सद्यस्थितीत टोल नाक्यावरील एका छोट्याशा खोलीतून पोलीस आपले कामकाज करत आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता जागेअभावी पोलिसांची परवड सुरू आहे. त्यामुळे जेऊर ग्रामपंचायत ने पोलिस दूर क्षेत्राच्या जागेविषयी तात्काळ निर्णय घेण्याची गरज आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles