Thursday, May 16, 2024

राजर्षी शाहू महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

राजर्षी शाहू महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

राहुरी प्रतिनिधी :-प्रसारमाध्यमांचे वर्तमानकाळात असलेले महत्त्व कुणीच नाकारू शकत नाही, मात्र वर्तमान मराठी भाषेचा आढावा घेतला तर, भाषा संवर्धनाच्या या कार्यात आजच्या तरुण पिढीचा मोठा सहभाग आहे. तरुणांनी अनेक भाषांतील नवनवीन शब्द स्वीकारून भाषिक लवचिकता अंगीकारल्यामुळेच २१ व्या शतकातही मराठी भाषा समृध्द झाली आहे, असे प्रतिपादन अहमदनगर येथील न्यु आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी केले.
देवळाली प्रवरा येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्वाती हापसे या होत्या.
डॉ. येळवंडे पुढे म्हणाले की, मराठी भाषा नष्ट होईल इतकी ती कमकुवत नाही, अडीच हजार वर्षांचा इतिहास आणि मध्ययुगीन कालखंडात महानुभाव आणि वारकरी संप्रदायांनी केलेले भाषाविषयक कार्य हीच आपली ओळख आहे. संत कवी, पंडित कवी आणि शाहिरी वाड्.मयाचा समृद्ध वारसा आपल्याला लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही भाषेचे महत्त्व ओळखून राजभाषा कोशाच्या निर्मितीसाठी पाठबळ दिले. आधुनिक कालखंडातही या वारशानेच आपल्याला तग धरण्याचे बळ दिले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी याच प्रेरणेतून मराठी विश्वकोश मंडळ, साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना करून भाषाविषयक कार्यास मोलाचा हातभार लावला. दुर्दैवाने पुढे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर भाषेचा विसर राज्यकर्त्यांना पडला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषा यापुढील काळात टिकवायची असेल तर, ज्ञान-विज्ञान आणि इतर कौशल्ये तसेच सामाजिक समृद्धीतूनच हे शक्य होईल. भाषा संवर्धन ही फक्त प्रशासकीय आणि राजकीय जबाबदारी नाही, तर मराठी भाषक म्हणून प्रत्येकाचे योगदान त्यात गरजेचे आहे. भविष्यकाळात अनुवादाच्या माध्यमातून इतर भाषेतील ज्ञान मराठी भाषेमध्ये येणे हे भाषा समृद्धीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा. अविनाश मेहेत्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. रवींद्र पाटील, विद्यार्थी विकास कार्यक्रम अधिकारी प्रा. राजू साळवे, प्रा. बाळासाहेब फुलमाळी, डॉ. सतीश कटके, डॉ. बापूसाहेब खिलारी, प्रा. रागिणी टेकाळे-कदम, प्रा. प्रकाश रोकडे, प्रा. दादासाहेब बंडगर, प्रा. संतोष गुंड, प्रा. महेश कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन प्रा. प्रमोद जाधव यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles