मुंबई: विकास प्रकल्पांच्या बाबतीत कळसूत्री असलेल्या मविआ सरकारने विकासाची कितीही पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फायदा होणार नाही.
शेतकरी, गोरगरीब, ओबीसी, मराठा, धनगर अशा सर्व घटकांच्या तोंडाला पाने पुसणारा हा मविआचा अर्थसंकल्प आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
या अर्थसंकल्पात ना विकासाला चालना, ना कोणत्या कल्याणकारी उपाययोजना.
या अर्थसंकल्पातून कोणतीही नवीन दिशा नाही, पुन्हा त्याच त्या घोषणा आणि उर्वरित आमच्या सरकारच्या काळातील योजनांचा गोषवारा त्यात आहे.
शेतकर्यांना कोणतीही मदत देण्यात आलेली नाही.
दोन वर्षांपूर्वींची 50 हजार रूपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा आज पुन्हा नव्याने करण्यात आली आहे.
अवर्षण/अतिवृष्टी/नैसर्गिक आपत्ती किंवा पीकविमा अशी कोणतीही मदत देण्यात आली नाही.
केंद्राच्या निर्णयानंतर 22 राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या. पण, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला कोणताही दिलासा दिलेला नाही.
सायकलवरून मोर्चा काढणारे आता कोणता मोर्चा काढणार, हा माझा प्रश्न आहे.
आमच्या काळातील बळीराजा योजना वगळली, तर विदर्भ आणि मराठवाड्याला कोणतीही मदत या अर्थसंकल्पातून करण्यात आलेली नाही. मराठवाडा ग्रीडची हत्या करण्यात आली. दुष्काळमुक्तीसाठीच्या सिंचन प्रकल्पांना कोणतीही मदत नाही. उत्तर महाराष्ट्र तर या अर्थसंकल्पात दिसतच नाही.
केवळ काही मतदारसंघांपुरता आणि केवळ काही नेत्यांपुरता हा अर्थसंकल्प आहे. बाकी केवळ केंद्राच्या योजनांचा पुनरुच्चार आहे.
कोविडच्या काळात सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू होऊन सुद्धा पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. सर्वच घटकांची घोर निराशा या अर्थसंकल्पाने केली आहे.






