अहमदनगर – एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल 66 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शिवम विहार, शिंदे मळा, सावेडी येथे राहणारे सेवानिवृत्त व्यक्तीने शुक्रवारी (दि. 14) दुपारी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या व्हॉट्सअपवर रिचा सेठी नावाच्या महिलेचा शेअर ट्रेडिंगबाबत मेसेज आला होता.
फिर्यादी यांनी याबाबत त्या महिलेकडून व्हॉट्सअपवर शेअर ट्रेडिंगबाबत अधिक माहिती घेतली. त्या महिलेने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी सेठी या नावाच्या महिलेने सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी तब्बल 66 लाख 55 हजार रुपये पाठविले. 20 मार्च ते 12 मे 2024 या कालावधीत हा प्रकार घडला. त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे मागण्यास सुरुवात केल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर संपर्क ही बंद झाला. दरम्यान त्यांना नफा मिळाला नाही व गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत मिळाली नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी रिचा सेठी नावाच्या अनोळखी महिलेवर भादंवि कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत.
शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना नगर शहरासह जिल्ह्यात वाढू लागल्या आहेत. 4 दिवसांपूर्वीच नगरमधील व्यावसायिकाची 15 लाख 55 हजारांची फसवणूक झाल्याचा गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे. अशा प्रकारे फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट सक्रीय असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नयेत असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.






