शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरण, सीए विजय मर्दासह दोघांना…

0
19

नगर शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) विजय विष्णुप्रसाद मर्दा व साहित्य खरेदीतील डीलर जगदीश बजाराम कदम यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, एका गुन्ह्यात जामीनासाठी मर्दा यांनी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यांना आता शहर बँक कर्ज फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या तिसर्‍या गुन्ह्यात वर्ग करुन घेण्यात येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले. डॉ. रोहिणी सिनारे यांच्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्यातून दोघांनाही डॉ. उज्वला कवडे यांच्या फिर्यादीवरून दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले होते.

न्यायालयाने दोघांना २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यानच्या काळात मर्दा यांनी डॉ. सिनारे यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. फसवणूक प्रकरणात डॉ. रोहिणी सिनारे, डॉ. उज्वला कवडे आणि डॉ. विनोद श्रीखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. आता दोघांनाही डॉ. श्रीखंडे यांच्या गुन्ह्यात वर्ग करुन घेण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्याकडे असल्याचे पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.