नगर : गेल्या सुमारे ४७ वर्षांतील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार रद्द ठरवत सुमारे १२.५ एकर जमिनीचा जिल्हाधिकारी गुरुवारी मूळ वारसांना ताबा देणार आहेत. यामुळे शहराच्या बुरुडगाव रस्ता भागातील सुमारे ३०० कुटुंब विस्थापित होण्याची शक्यता आहे. ताबा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या परिसरात ठिकठिकाणी जाहीर प्रकटन केले आहे. तसेच प्रत्यक्ष ताबा देण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे.
सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कार्यवाही होत असल्याचे नगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले. सर्व्हे क्रमांक ४६/२, ४७/६, ५९/४, ५१/१, ५२/२, १३३/३ व १३३ येथील १२.५ एकर जागेचा तिघे वादी व पाच प्रतिवादी अशा एकूण ८ जणांना ताबा दिला जाणार आहे.
मूळ मालक ममुलाबाई महबूब शेख व तिची मुलगी छोटीबी करीमभाई शेख यांच्या शेत जमिनीचा हा वाद होता. विक्री दरम्यान तो सन १९७७ मध्ये न्यायालयात दाखल झाला. त्याचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याचे आदेश सन २००४ मध्ये देण्यात आले. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे अपील, त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील या मार्गे सन २००९ मध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाने ६ महिन्यांत वाटप करण्याचे आदेश सन २०१८ मध्ये दिले.
त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी सन २०१९ मध्ये दिलेल्या वाटप आदेशावर पुन्हा जिल्हाधिकारी, नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले. त्यांनी ते फेटाळत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. त्याला जमीन खरेदीदार मंगला शरद मुथा यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली. त्या विरोधात हसन बाबू झारेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात हरकत घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ४ डिसेंबर २०२३ रोजी ४ महिन्यांत वाटप करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी ५ जानेवारी २०२४ रोजी वादी व प्रतिवादी या दोघांना बोलावून वाटप निश्चित केले. त्याची कार्यवाही आता उद्या होत आहे.
दरम्यानच्या काळात या जागेत लेआउट मंजूर झाले. भूखंडांची खरेदी विक्री झाली, नागरी वस्ती निर्माण झाली, वसाहती उभ्या राहिल्या. महापालिकेने रस्ते, पाणीपुरवठा केला. परंतु आता १२.५ एकर जागा मूळ वारसांना ताबा दिला जाणार आहे.
बुरुडगाव रस्ता ते पुणे रस्ता यादरम्यानच्या पट्ट्यातील भोसले आखाडा, विनायकनगर, चंदन इस्टेट, माणिकनगर, शिल्पा गार्डन या परिसरातील १२.५ एकर जागेचा ताबा मूळ मालकांना दिला जाणार आहे. यामध्ये भोसले आखाडा भागातील घोषित झोपडपट्टीचा जसा समावेश आहे तसा चंदननगर, माणिकनगर वसाहतीतील टोलेजंग बंगल्यांचाही समावेश आहे.