काँग्रेसच्या दाव्याने खळबळ! अहमदनगरमधील सात विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने ठोकला दावा

0
19

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर नगर जिल्ह्यातील बदलत्या राजकीय वातावरणाचा फायदा घेण्यासाठी आता सगळेच पक्ष सरसावत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने जादा जागा लढविण्यासाठी चाचपणी सुरू केलेली असताना आता काँग्रेसनेही पूर्वीपेक्षा ४ जागा वाढवून घेण्याची मागणी करीत १२ पैकी सात जागांवर दावा केला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही नगरच्या जागा वाटपावरून मोठा खल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. त्यानंतर बदलत्या समीकरणाचा फायदा घेण्यासाठी महाविकास आघाडीसोबतच महायुतीनेही मोर्चेबांधणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जास्तीत जागा लढविण्याची तयारीही सुरू केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही यातील काही जागांवर दावा केला आहे.

आता काँग्रसेनेही संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी या पूर्वीच्या जागांसोबत श्रीगोंदा, नगर शहर, कोपरगांव व अकोला या वाढीव जागांवर दावा सांगितला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी पक्षाचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे यासंबंधीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली तसेच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. यामधे काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या एकुण १२ जागा आहेत. काँग्रेस पक्षाकडे संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी अशा केवळ तीनच जागा आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला आणखी ४ जागा मिळणे गरजेचे आहे. त्यात श्रीगोंदा, नगर शहर, कोपरगांव व अकोला या जागा प्रधान्यक्रमाने घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील या सातही मतदारसंघात आपल्या पक्षाची खूप चांगली ताकद आहे. या मतदारसंघातून आपल्या नेतृत्वातून व पक्ष संघटनामुळे पक्षाचे उमेदवार नक्कीच विजयी होतील, अशा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला आहे.