दीड वर्षांपूर्वी मुंबईत हरवलेली आई सापडली पंढरपूरात, माऊलीच्या व्हायरल रीलनं केली कमाल…Video

0
45

दीड वर्षांपूर्वी मुंबईतून हरवलेली आई विठू माऊलीच्या दरबारात सापडली. आषाढी एकादशीच्या निमित्तानं सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. यापैकी एका व्हायरल रीलमुळे आई-मुलाची भेट झाली.शिवाजी धुते नावाचा एक फोटोग्राफर आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमधील दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता. दरम्यान त्यानं एका लहान मुलाचा व्हिडीओ काढला. या व्हिडीओमध्ये हा मुलगा २० रुपयांचे रेनकोट विकत आहे. खरं तर एका लहान मुलाची संघर्षकथा दाखवण्याच्या हेतून हा व्हिडीओ शूट केला जात होता.

पण या व्हिडीओमध्ये आसपासची काही माणसांसोबत ती हरवलेली महिला देखील कैद झाली. हा व्हिडीओ व्हायरल होताच, शिवाजी धुते याला एक फोन आला आणि त्या व्हिडीओमधील महिला माझी आई असल्याचं तो सांगू लागला. मग हा व्हिडीओ कुठे शूट केलाय? कधी शूट केलाय? याबद्दल सगळी माहिती त्या तरुणानं मिळवली आणि थेट आपला मोर्चा पंढरपूरच्या दिशेनं वळवला. आता लाखोंच्या गर्दीत आईला शोधायचं कसं? हा मोठा प्रश्न होता. पण त्या मुलानं विठूमाऊलीचं नाव घेतलं आणि शोध सुरू केला. अन् काय सांगता काही तासांमध्येच चंद्रभागेच्या तीरी त्याची आई बसलेली सापडली.