संसदेचे अधिवेशन सोडून खा.निलेश लंके यांचे नगरमध्येच उपोषण… लोकसभा निवडणुकीत पोलिसांनी फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप…

0
11

जिल्हा पोलीस दलातील चुकीच्या कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर , सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. या वेळी अनेकांनी पोलिसांच्या कारभाराविरोधात खासदार लंके यांच्याकडे तक्रारी केल्या. कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाररुपी मडकी फोडली. लोकसभा निवडणूक काळात पोलिसांकडून आपलाच मोबाईल टॅप केला जात होता, असा गंभीर आरोपही खासदार लंके यांनी केला.

पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीवर आरोप करत खासदार लंके यांनी उपोषण सुरू केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी या वेळी विरोधकांवर गंभीर आरोप केले.

ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे विक्रम राठोड आदी उपस्थित होते. हरिभाऊ आहेर (खोसपुरी), मंदा पागिरे, प्रियंका गायकवाड, सरफ सुवर्णकार संघटनेचे प्रकाश लोळगे आदींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.

लोकसभा निवडणुकीच्या काळात माझा मोबाईल ट्रेस केला, सीडीआर काढले, फोन रेकॉर्ड करण्यात आला, काहींनी पोलिसांनी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली तर त्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांची फोनही टॅप केले जातात, असाही आरोप खासदार लंके यांनी केला. अवैध वाळू, अवैध धंदे, जुगार सर्रास सुरू आहेत. जुगारामुळे युवक आत्महत्या करत आहेत. नागरिकांच्या याबद्दल वाढत्या तक्रारी आहेत, असे खासदार म्हणाले.