दोन लाखाचा धनादेश मुदतीत न वटल्याने आरोपीस शिक्षा
चार महिन्याचा सश्रम कारावास आणि 2 लाख 21 हजार देण्याचे न्यायालयाचे आदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील फिर्यादी अशोक शिंदे यांनी वाहन खरेदीच्या व्यवहारापोटी आरोपी तुकाराम बोरुडे यांना 4 लाख रुपये रोख रक्कम दिलेली होती. परंतु आरोपी याने सदरील वाहन विक्रीचा व्यवहार पूर्ण न करता सदरील रक्कम रुपये 4 लाख पैकी प्रत्येकी 1 लाख रुपयाचे दोन धनादेश स्वरूपात दिले होते. फिर्यादी यांनी सदरील धनादेश त्यांच्या स्वतःच्या खात्यात जमा केले असता, सदरील धनादेश आरोपींच्या खात्यात अपुरा निधी कारणांनी वटला नाही व परत आला.
फिर्यादी यांनी आरोपीला कायद्याप्रमाणे नोटीस पाठवली, परंतु आरोपीने सदरील नोटीस स्वीकारण्यास जाणीवपूर्वक नकार दिला म्हणून फिर्यादीने आरोपी विरुद्ध अहमदनगर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी साहेब यांचे न्यायालयात 1 ऑगस्ट 2023 रोजी धनादेश न वटल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. तर या प्रकरणाच्या संदर्भात योग्य ते पुरावे दाखल केले. न्यायालयाने फिर्यादी यांनी दाखल केलेले सर्व पुरावे, फिर्यादी यांच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी बोरुडे यांना न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी धनादेश न वटल्याप्रकरणी दोषी ठरवत चार महिन्यांचा सश्रम कारावास व नुकसान भरपाई म्हणून 2 लाख 21 हजार रुपये देण्याची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादीतर्फे ॲड. आशिष एस. सुसरे यांनी काम पाहिले.