दुचाकी चोरी करायचे, स्पेअर पार्ट सुट्टे करून विकायचे,चौघांची टोळी कोतवाली पोलिसांकडून गजाआड

0
17

अहमदनगर-शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करून तिचे स्पेअर पार्ट सुट्टे करून ते विक्री करणारी टोळी कोतवाली पोलिसांनी गजाआड केली आहे. तीन चोरट्यांसह एका दुचाकी गॅरेजवाल्याचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी, दोन दुचाकींचे स्पेअर पार्ट असा दोन लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

रोहीत आप्पासाहेब शिरोले (वय 21 रा. सौरभनगर, भिंगार), यश प्रकाश ओहळ (वय 21 रा. यशवंतनगर, भिंगार), करण कैलास पवार (वय 23 रा. विजयलाईन, तुळजा भवानी मंदिराजवळ, आलमगीर रस्ता, भिंगार), इम्राण सलिम शेख (वय 21 रा. शाह कॉर्नर, आलमगीर) अशी त्यांची नावे आहेत. 21 जुलै 2024 रोजी गोपीनाथ तुकाराम घुसाळे (वय 58 रा. गवळीवाडा, भिंगार) यांची दुचाकी केडगाव इंडस्ट्रीयल एरीया येथील इमारत कामाच्या साईटवरून चोरीला गेली होती. याप्रकरणी घुसाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यासह इतर दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की, दुचाकी चोरी करणारे संशयित आरोपी हे सराईत आहेत. ते शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करतात व त्या दुचाकी भिंगारमधील एका गॅरेजवाल्याकडे घेऊन जातात. तेथे त्यांचे स्पेअर पार्ट सुट्टे करून त्याची विक्री केली जाते.

या माहितीवरून कोतवाली पोलिसांचे पथक संशयित आरोपींचा शोध घेत असताना एक संशयित व्यक्ती एका दुचाकीला त्याच्याकडील डुप्लीकेट चावी लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी पाहिले. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता मी सदरची दुचाकी चोरून घेऊन जाणार होतो व माझ्यासोबत आणखी दोघे आहेत ते देखील माळीवाडा येथे दुचाकी शोधत आहेत. आम्ही सदर चोरी केलेल्या दुचाकी या भिंगारमध्ये एका गॅरेजवर फिटरकडून सुट्ट्या करून घेतो व त्यांची स्पेअर पार्ट विक्री करतो अशी माहिती दिली. पोलिसांनी त्या व्यक्तीच्या मदतीने इतरांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या घर व गॅरेजची झडती घेतली असता त्यांच्याकडे पाच दुचाकी व दोन खोललेल्या दुचाकीचे स्पेअर पार्ट असा एकूण दोन लाख 50 हजारांचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.

सदरच्या दुचाकी त्यांनी कोतवाली, भिंगार पोलीस ठाण्यासह मध्य प्रदेशातील सरदारपूर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केल्या असल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक महेश शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, अंमलदार योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, गणेश धोत्रे, विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, सलीम शेख, राहुल शिंदे, सतीश भांड, अभय कदम, अमोल गाढे, सतीश शिंदे, अनुप झाडबुके, राहुल गुंडु यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.