नगरच्या कन्येचा चेन्नई दूरदर्शन वर भरतनाट्यम नृत्याविष्कार !
नगरच्या सुप्रसिद्ध गायिका व नृत्यांगना नृत्यगुरु नृत्य तपस्वी सौ.वर्षा पंडित तसेच नगरचे ज्येष्ठ संगीत समीक्षक चंद्रकांत पंडित यांची कन्या कु.नताशा हिचा चेन्नई दूरदर्शन वर नृत्याचा विशेष कार्यक्रम नुकताच सादर झाला कु. नताशाने गेल्या १३ वर्षांपासून चेन्नई येथे राहून भरतनाट्यम नृत्यात प्रावीण्य मिळवले आहे.
नगरमधून नृत्य विशारद झाल्यानंतर चेन्नई येथील ‘ कलाक्षेत्र फाउंडेशन ‘ या जगविख्यात असलेल्या संस्थेमधून पदवी घेतली .त्यानंतर चेन्नईतील सुप्रसिद्ध मा.नृत्यगुरू श्री शिजीत कृष्ण यांच्या नामांकित सहृदय फाउंडेशन संस्थेत भरतनाट्यम नृत्य तसेच गायन, वादनाचे पुढील प्रगत शिक्षण घेतले व गेली पाच वर्ष त्याच संस्थेत नृत्य अध्यापक म्हणून कार्यही करत आहे. तसेच ती नृत्याचे ऑनलाईन क्लासेस पण घेते त्यात तिच्याकडून देश विदेशातील विद्यार्थी देखील भरतनाट्यमचे तंत्र शुद्ध शिक्षण घेत आहेत.
दिनांक २८ जानेवारी रोजी तिचा चेन्नईच्या दूरदर्शन चॅनलवर एकल नृत्याविष्कार प्रसारित झाला व नंतर त्याच कार्यक्रमाचा दुसरा एपिसोड दिनांक ३० जानेवारी रोजी प्रसारित झाला. गेल्या वर्षीही विद्या भवन मैलापुर येथे एकल नृत्याचे सादरीकरण झाले होते आणि त्याची खूप प्रशंसाही झाली होती व रसिकांचा त्यास उदंड प्रतिसाद मिळाला होता.
नताशाचे आजवर तिच्या गुरुंसमवेत चेन्नई, केरळ , बेंगलोर , गोवा ,मुंबई , म्हैसूर , ऊटी, पुणे असे अनेक ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत . नगरासारख्या छोट्याशा शहरातून चेन्नईसारख्या मेट्रोसिटीमध्ये जाणे , आपल्या घरापासून लांब १३ वर्ष तिथे राहणे , तिथली भाषा शिकून घेऊन, तिथल्या संस्कृतीशी एकरूप होणे , तिथल्या कलेची, नृत्याची संस्कृती आत्मसात करून त्यात प्रावीण्य मिळवणे ,सर्व गुरुजन ,व समीक्षकांच्या पसंतीस उतरणे आणि आज नॅशनल दूरदर्शन वर नृत्याचा एकल नृत्याविष्कार सादर करणे इथपर्यंतचा हा प्रवास इतरांसाठी खूप प्रेरणादायी आहे .
आजपर्यंत नगरच्या सांस्कृतिक परंपरेत अनेक मान्यवर कलाकारांनी दूरदर्शन वर आपल्या संगीत कलेचे सादरीकरण केले आहे .त्या यादीत आता भरतनाट्यम नृत्यासाठी कुमारी नताशा हीच्या नावाचा समावेश झाला आहे ही बाब नगरकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे .
नृत्याच्या क्षेत्रात तिने आमचेच नव्हे तर नगरचे नाव मोठे केले आहे असे प्रतिपादन विद्यालयाचे सह संचालक श्री चंद्रकांत पंडित यांनी केले. हे यश म्हणजे कलेचा ध्यास , संपूर्ण श्रध्देने केलेली अखंड नृत्य साधना उत्तम गुरूंचे मार्गदर्शन व आशीर्वाद याचेच फलित आहे. तिची प्रेरणा घेऊन तिच्यासारखं नृत्यच नाही तर अभिनय ही विद्यार्थ्यांनी शिकावा व आत्मसात करावा , अश्या भावना नृत्यतपस्वी सौ.वर्षा पंडित यांनी व्यक्त केल्या . तिचा भरतनाट्यम कलेचा हा दैदीप्यमान प्रवास थक्क करणारा आहे. या यशाबद्दल कु. नताशाचे सर्वत्र कौतुक होत आहे .






