अहमदनगर : सॉफ्टवेअर डेव्हलपच्या कामासाठी
पुण्याला निघालेल्या ता. शेवगाव येथील शेअर मार्केट व्यवसायिक युवकाचे तिसगाव ता.पाथर्डी, हद्दीत बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. तब्बल तीन तासांच्या थरारक प्रसंगानंतर खंडणी खोरांनी संबंधितांकडून १५ लाख रुपये घेऊन, त्या युवकाला सोडून दिले आहे. या प्रकरणी अज्ञता युवकांच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खळबळ उडाली आहे.
अनिरुद्ध मुकुंद धस रा. एरंडगाव ता. शेवगाव असे अपहरण करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून त्याने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, मित्र वैष्णव शिंदे याचे समवेत फॉर्च्यूनर गाडीने शेवगाव येथून पुणे येथे सॉफ्टवेअर डेव्हलपच्या कामासाठी जात असताना, अमरापुर ते तिसगाव रोडवर तिसगाव शिवारात केसर हॉटेल समोर पाठीमागून आलेल्या एका विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडी चालकाने गाडी आडवी लावली.
यावेळी गाडीतून उतरलेल्या चार जणांनी गाडीला कट का मारला असे म्हणत, जबरदस्तीने या दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करुन स्विफ्ट मध्ये कोंबले. यावेळी डोक्याला पिस्टल लावून शेअर मार्केट करतो, साठ लाख रुपये दे, पैसे दिले नाही तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. गाडी कासार पिंपळगाव मार्गे, जवखेडे रस्त्याने घेऊन गेले. यावेळी घाबरलेल्या धस याने मोबाईलवरून संपर्क साधून ओम वाकळे यास १५ लाख रुपये घेऊन तिसगाव येथे येण्यास सांगितले. दरम्यान गाडी वृद्धेश्वर डोंगर, खऱवंडी, भगवानगड रस्त्याकडे घेऊन घेऊन गेले. तिथे गेल्यावर पुन्हा त्यांच्या मित्रांना फोन लावून भगवानगड फाटा येथे पैसे घेऊन येण्यास सांगितले. ओम वाकळे व संग्राम काळे पैसे घेऊन फाट्यावर आले. यावेळी मोटार सायकल वरुन आलेल्या एका युवकाने त्यांच्या हातातील पैश्याची बॅग घेऊन मिडसांगावीच्या दिशेने पळ काढला. दरम्यान अपहरण झालेल्या युवकांना सोडून दिल्यावर ते तिसगाव येथे दाखल झाले. गाडी ताब्यात घेत, पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल होऊन फिर्याद दिली आहे. डोक्याला पिस्टल लावून धमकी देऊन फिर्यादी कडून १५ लाख रुपये घेतले. सुमारे पावणे तीन तास हे अपहरण नाट्य सुरु होते. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर हे तपास करीत आहेत.
शेअर मार्केट व्यवसायिकाचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण,१५ लाख रुपये दिल्यावर झाली सुटका…
- Advertisement -