अहमदनगर – वडगाव गुप्ता परिसरात असलेल्या शेतजमिनीत प्लॉट पाडून परस्पर सुमारे ३३ जणांना खरेदी खत करून देत विक्री करून एकाने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी असलेले अॅड. प्रताप बबनराव ढाकणे यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात श्रेणिक धरमचंद खाबिया (रा.सावेडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अॅड. प्रताप ढाकणे यांनी शुक्रवारी (दि.१९) दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली आहे. अॅड.ढाकणे यांच्या मालकीची वडगाव गुप्ता परिसरात एन.ए. न केलेली अविभक्त शेत जमीन आहे. त्यांच्या शेजारीच आरोपी श्रेणिक धरमचंद खाबिया याचीही काही शेतजमीन होती. खाबिया याने अॅड.ढाकणे यांना कुठलीही कल्पना न देता त्याच्या जमिनीसह ढाकणे यांच्या जमिनीतही प्लॉट पाडून सुमारे ३३ जणांना सदर जमीन आपल्याच मालकीची आहे असे भासवून विक्री केली.
त्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखते ही करून दिली. या ३३ पैकी अनेकांनी तेथे त्यांच्या मर्जी नुसार तारेचे कुंपण तर काहींनी कोणतीही परवानगी न घेता पक्की घरे बांधली आहेत. त्यांनी रस्ता व वहिवाटीचा कुठलाही विचार न करता अतिक्रमणे केली आहेत. हा सर्व प्रकार ९ ऑगस्ट २०१९ ते ५ मार्च २०२४ या कालावधीत घडला आहे.
ही बाब निदर्शनास आल्यावर अॅड.ढाकणे यांनी या ३३ जणांच्या खरेदीखतांचे अवलोकन केले असता सदर जागा ही बिगर शेती केलेली नसतानाही गुंठेवारी करून आणि चतुर्सिमा न ठरवताच श्रेणिक खाबिया याने विक्री करत आपली फसवणूक केली असल्याचे अॅड.ढाकणे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी श्रेणिक खाबिया विरुद्ध भा.दं.वि.४२०, ४४७, ४४८ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.