नगर : सायकल दुरुस्तीचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्याच्या मुलाने बिकट परिस्थितीवर मात करुन दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 94.20 टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली आहे. गौरव चंगेडिया याने दहावीच्या परीक्षेत उत्तम प्रकारे यश मिळवून आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज केले आहे.
गौरव याची आई निर्मला ही गृहिणी तर वडील विनोद चंगेडिया यांचे केडगावला सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. जवळपास 35 वर्ष भाड्याच्या खोलीत राहून मार्केट व नंतर 15 वर्षांपासून सायकल दुरुस्तीचे कामं करत चंगेडिया यांनी प्रतिकूल परिस्थितीत गौरवाला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. गौरव हा पटवर्धन चौक येथील मेहर इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असून शालेय गुणवत्ता यादीत देखील तो पहिला आला आहे. त्याला वर्गशिक्षिका उषा भालेराव व प्राचार्या अनुरिता झगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे केडगाव येथील  ज्ञानसाधना गुरुकुलचे प्राध्यापक प्रसाद जमदाडे यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी त्याच्याकडून योग्य अभ्यास करुन घेतला व मार्गदर्शन केले. गौरवला भविष्यात अभियंता होण्याची इच्छा असून, त्या दृष्टीने तो पुढे शिक्षण घेणार असल्याची भावना त्याने व्यक्त केली.






