लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आणि त्याच्यासोबत असलेले अजय कस्तुरे या दोन अधिकाऱ्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. या दाेघांवर अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत त्यांच्या मौजे मरशिवणी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील सर्वे नंबर 56 मधील 3600 चौरस मीटर क्षेत्रास वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी प्राप्त झालेली असून त्यामध्ये अंतिम परवानगी मिळण्याकरिता अहमदपूर नगरपरिषद येथे दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये तक्रारदार यांनी ऑनलाइन चलान भरणा केलेला.
त्यांचे प्रलंबित कामाकरिता पाच फेब्रुवारीला नगरपरिषद कार्यालयात गेले असता त्यांना कस्तुरे यांनी त्यांचे प्रलंबित कामाकरिता स्वतःसाठी व मुख्याधिकारी यांच्यासाठी असे मिळून एकूण सात लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. एसीबीने बुधवारी (ता. 14) शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता दाेन्ही अधिकारी यांनी सात लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे व तडजोडी अंती पाच लाख रूपये स्विकारण्याचे निश्चित केले. त्यानंतर कस्तुरे यांनी एका कारमध्ये पाच लाख रुपये शासकीय पंचांसमक्ष स्वतः स्विकारली. यानंतर एसीबीने दोन्ही अधिकारी यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.