बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव करून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विजयी ठरले आहेत. बीड हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु, या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून शरद पवारांनी त्यांच्या विजयाची तुतारी तिथे फुंकली आहे. परंतु, या मतदारसंघातून निवडून आलेले बजरंग सोनवणे आता अजित पवारांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत एक्स पोस्ट केली असून माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली आहे.
“बीडच्या बप्पाचा दादांना फोन. मोठ्या मनाचा दादा”, अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली आहे. परंतु, त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी कोणाचंही थेट नाव घेतलं नव्हतं. परंतु, पत्रकारांनी त्यांना याबाबत बोलतं केल्यावर त्यांनी बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केला होता, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत, असं म्हटलं आहे.
अमोल मिटकरी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, “बजरंग सोनवणे यांनी फोन केला होता, यात तथ्य आहे म्हणून मी सांगतोय. आम्ही सर्व त्या घटनेचे साक्षीदार आहोत. दादा जनतेचे काम करणारे आहेत. दादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. परंतु, त्याला दुसराही अँगल असावा. याबद्दल माझ्या मनात शंका नाही.”
https://x.com/amolmitkari22?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1800496762463150260%7Ctwgr%5Ee3bc40d27c9b20f4c4ae2b28c48653896c7c74af%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fbajrang-sonwane-on-the-way-to-rebellion-big-claim-from-ajit-pawar-group-leader-sgk-96-4422187%2F