आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्या टिकेचा संदर्भ घेत अजित पवारांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली.रोहित पवारांचा जिल्हा परिषद सदस्य ते आमदारकीपर्यंतच्या प्रवासातील एक किस्सा अजित पवारांनी सभेत सांगितला. ‘रोहित पवारांना जिल्हा परिषदेला उभं राहायचं होतं. मी पवार साहेबांच्या कानावर ही बाब घातली. तेव्हा पवार साहेबांनी ठामपणे नाही म्हणून सांगितले. काम धंदा बघा असा सल्ला साहेबांनी दिला. त्यावर मला एक कुणकुण लागली की राजेंद्र पवार यांनी अपक्ष फॉर्म आणला होता. त्यावरून मी पुन्हा पवार साहेबांकडे गेलो आणि त्यांना समजावून सांगितले. मात्र त्यानंतर पवार साहेबांचेही न ऐकता मी रोहितला एबी फॉर्म दिला आणि जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली,’ असं अजित पवारांनी सांगितलं.
रोहित पवारांना हडपसरमध्ये विधानसभेसाठी उभं राहायचं होतं. एकाच कुटुंबातील दोघेजण एकाच जिल्ह्यातून उभे राहिल्यास वेगळा संदेश जाईल असं मी त्याला सांगितलं. मात्र तो आमदारकी लढवण्यावर ठाम होता. हडपसरमध्ये त्याचे सासरे मगर यांचं काम आहे असं त्यांनी सांगितलं. मात्र हडपसरमध्ये पाच लाख मतं आणि मगरपट्टा केवढा हे त्याला मी समजावून सांगितलं. नंतर त्याला कर्जत जामखेडची उमेदवारी दिली,’ अशा किस्सा अजित पवारांनी सभेत सांगितला.