Wednesday, May 22, 2024

उत्तर प्रदेशची निवडणूक एका दिवसात आणि महाराष्ट्राची ५ दिवसांत. हे कशासाठी? ..शरद पवार यांचा सवाल…

वेल्हा येथे महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.

लोकप्रिय आमदार संग्राम थोपटे, महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष याशिवाय इतर जे पक्ष आहेत, ज्यांचा पाठिंबा आहे, या पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती याठिकाणी आहे, या सगळ्यांचा याठिकाणी उल्लेख करतोय. आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले वेल्हेकर बंधु भगिनींनो..!

मला आठवत नाही कधी आलो होतो इथे, पण ही गोष्ट खरी आहे की बऱ्याच वर्षाने आलो. लोकसभेची निवडणूक निघाली, सबंध देशामध्ये ठिकठिकाणी विविध राजकीय पक्ष, त्यांची भूमिका लोकांसमोर मांडत आहेत. लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे. महाराष्ट्राची निवडणूक आहे, आणि ती निवडणूक पाच टप्प्यात आहे. अशी गंमतीची गोष्ट आहे. तमिळनाडू राज्य. तिथे एकंदरीत खासदारांची संख्या ४०. आणि ४० जणांची निवडणूक एका दिवशी. महाराष्ट्राच्या खासदारांची संख्या ४८. इथली निवडणूक पाच दिवसांची, उत्तर प्रदेशची निवडणूक एका दिवसात आणि महाराष्ट्राची ५ दिवसांत. हे कशासाठी? ही गोष्ट लक्षात येत नाही. या देशाचे प्रधानमंत्री, ज्यांना जिथं आपली शक्ती कमी असं वाटतं, त्या ठिकाणची निवडणूक एकाऐवजी ४-४ दिवस आणि त्यांना टिका टिप्पणीच करता येते. कालच ते आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्रात होते. सभा घ्यायला काही हरकत नाही, पण एका पक्षाला तुम्ही १० वेळेला सभा घ्यायला संधीही देता आणि काही पक्षांना एका दिवसात संपवा म्हणून सांगता. याचा अर्थ ही निवडणूक नियमानुसार होत असेल, पण समान संधी याठिकाणी मिळत नाही.

आज काय दिसतंय? अनेक प्रश्न पुढे आहेत. कुणीही आणि विशेषत: प्रधानमंत्री असेल, अशा व्यक्तीने दोन गोष्टी करायच्या असतात. एक उद्याच्या हिंदुस्थानचं चित्र आम्ही कसं बदलणार आहोत, नवीन काय करणार आहोत आणि मग टीका टिप्पणी करायची असेल तर ती करता येते. तुमच्यापैकी कदाचित कुणी माझ्यासारखा भाग्यवान नसेल. मला जवाहरलाल नेहरूंची निवडणुकीची भाषणं ऐकायला मिळाली. नेहरू काय बोलायचे, स्वातंत्र्याचा इतिहास. स्वातंत्र्यामध्ये काँग्रेसने केलेलं काम आणि उद्या या देशात काय करायचं या संबंधीचं त्यांचं भाषण असायचं. विरोधकांवर टीका टिप्पणी कधी असायची नाही आणि हीच भूमिका इंदिरा गांधींची होती. पण मोदी साहेबांसारखी नाही. मोदी साहेब ज्या वेळेला मनमोहन सिंहांचं राज्य होतं, त्यावेळेला मोदी साहेब आपल्या भाषणामध्ये सगळ्यात जास्त बोलायचे. महागाईबद्दल आणि त्यांनी सांगितलं की माझ्या हातात सत्ता द्या, मी ५० दिवसामध्ये पेट्रोलचे भाव खाली आणतो. चांगली गोष्ट आहे. २०१४ ला त्यांनी हे सांगितलं. २०१४ ला पेट्रोलचा दर ७१ रुपये लिटर होता. दहा वर्ष मोदींचं राज्य आहे. ५० दिवसांमध्ये ते पेट्रोलचे दर कमी करणार होते, आज पेट्रोलचे दर किती आहे १०६ कि १०७. तर ५० दिवसांमध्ये भाव कमी करणार होते. ते ७० वरून १०५ झालं. कसा विश्वास ठेवायचा? घरगुती गॅस, हा जो इंधन गॅस सिलेंडर तो आता खेड्यापाड्यात सुद्धा पोहोचणार तर गॅस सिलेंडरच्या बाबतीत २०१४ ला आम्हा लोकांचे राज्य ज्यावेळी गेलं, त्यावेळी ४१० रुपयाला एक सिलेंडर होता. आज तो ११६० रुपयांना आहे आणि मोदी साहेबांनी सांगितलं, की ५० दिवसांत कमी करतो. त्यांनी इतकं सांगितलं, त्यांचं भाषण माझ्याकडे आहे. ते लोकांना आया बहिणींना सांगतात की, मताला जाताना सिलेंडरला नमस्कार करा, त्याची पूजा करा आणि नंतर जा. कारण हे भाव आम्ही कमी करणार आहोत. ते केले त्यांनी? नाही केले. असं ते सांगायचे. देशाचं नेतृत्त्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी स्वच्छ प्रामाणिकपणानं वस्तुस्थिती सांगायला हवी. ती न सांगता इतरांवर टीका करायची आणि चुकीच्या गोष्टी सांगायच्या. मोदी साहेबांनी सांगितलं, की आमच्या हातात सत्ता आल्यानंतर दरवर्षी २ कोटी मुलांना नोकऱ्या मिळतील. आज शेकडो मुलांना आज या देशात नोकरी नाही. त्यांची फसवणूक नाही झाली? त्यांची फसवणूक याठिकाणी आजच्या राज्यकर्त्यांनी केली. काळ्या पैशाबद्दल मी काही सांगत नाही.

ते सांगतात, आमच्या हातात सत्ता आली की, भ्रष्टाचार खत्म करू. आज काय चित्र दिसतंय? सर्वत्र भ्रष्टाचार, आणि त्या भ्रष्टाचाराची जबाबदारी सत्ताधारी पक्षाला चालत आहे. आज सत्तेचा गैरवापर करणं ही भूमिका आजच्या भाजप सरकारची आहे. गैरवापर कसा करायचा, त्याला एखादी गोष्ट पटली नाही, तर कायदा हातात घ्यायचा, अटक करायचं, तुरुंगात टाकायचं, कुणाला फसवता ? आता काल मी सातारा जिल्ह्यात होतो. शशिकांत शिंदे, माथाडी कामगारांमध्ये काम करणारे सहकारी, तो आपला उमेदवार आहे, चांगलं काम करणारा आहे. माझी सभा झाली आणि रात्री शशिकांतवर खटला भरला. अटक करण्याच्या संबंधात. बघूयात आता पुढे काय होतंय. पण विरोधी माणूस विरोधी पक्ष त्यांच्याबद्दल वेगळी मतं मांडत असेल, तर त्याच्यावर खोट्या केसेस करून त्याला तुरुंगात टाकायचं हे सूत्र असं भाजपचं आहे मोदी साहेबांच्या आशीर्वादाने.

हा देश लोकशाही सोडून हुकूमशाहीकडे जाऊ लागला आहे आणि ही भूमिका राज्यकर्त्यांची आहे, काय वाटेल ते आम्ही किंमत देऊ. पण या देशात आम्ही हुकूमशाही कदापि मान्य करणार नाही. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी कष्ट केले, आजचे प्रधानमंत्री त्यांचा सन्मान करत नाहीत. कधी नेहरूंवर टीका, कधी इंदिरा गांधींवर टीका असेल, कधी राजीव गांधीवर टीका करणार आणि हल्ली राहुल गांधींवर टीका करतात. राहुल गांधीचा उल्लेख काय करतात? शाहजादे आणि शाहजादे म्हणून टीका करतात. त्यांना आश्चर्य आहे की, हा तरुण राहुल गांधी देशातल्या जनतेचे प्रश्न हे व्यवस्थित समजायचे म्हणून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालत गेला. रस्त्याने लोकांना भेटला. शेतकरी होते त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. कष्ट करणारे कामगार त्यांचं दु:ख ऐकलं. आया बहिणी असतील, त्यांचं दुखण ऐकलं. सबंध देशात पायी जाऊन तिथले प्रश्न समजून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काही कार्यक्रम घेण्याची तयारी ज्या तरुणामध्ये आहे, त्याला शाहजादे म्हणायचं याचा अर्थ हा आहे की मोदी साहेब लोकशाही पद्धतीवर विश्वास ठेवतात का नाही, याची शंका येईल. अशा पद्धतीनं आज त्यांचं काम चाललेलं आहे. काल त्यांनी माझ्यावर टीका केली, चांगली गोष्ट आहे.

देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात आल्यानंतर दोन लोकांवर बोलतात. एक शरद पवार आणि दूसरे आहेत आमचे ठाकरे. या ठाकरेंवर, शिवसेनेवर टीका करायची, माझ्यावर टीका करायची. माझ्यावर त्यांनी सांगितलं काय? की, महाराष्ट्रामध्ये एक माणूस ४५ वर्ष महाराष्ट्रात फिरतोय आणि लोकांचं सरकार अस्थिर करतंय, ही गमतीची गोष्ट आहे. महाराष्ट्रात मी फिरतोय, माझं राज्य आहे, माझे लोक आहेत, त्यांच्यासमोर जाणार, त्यांच्याबरोबर बोलणार हा लोकशाहीचा माझा अधिकार, पण ते सुद्धा सहन होत नाही. त्यासाठी त्यांची टीका टिप्पणी आम्हा लोकांवर अधिक आहे. त्यांनी टीका ही केली की, त्या शेतीमालाच्या किंमती आम्ही वाढवल्या. त्यांच्यापेक्षा जास्त वाढवल्या, असं काही म्हणलं असतं तर समजू शकतो. शेतकऱ्यांच्या डोक्यावरच्या कर्जाला आम्ही निर्णय घेतलाय. त्याच्यात आणखी काय सुधारणा करायची असेल तर त्याच्याबद्दल ते बोलू शकतात. नव्या पिढीला कष्ट करायचा अधिकार आहे. त्यासाठी आम्ही रोजगार हमीसारखा कायदा केला. त्यात काय दुरुस्ती करायची असली त्याच्यावर काहीतरी भाष्य केलं तर मी समजू शकतो. पण लोकांच्या दृष्टीने जेवढे महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे ढुंकूणसुद्धा बघायचं नाही आणि फक्त काँग्रेसला शिव्या घाला, राष्ट्रवादीला शिव्या घाला, नेत्यांना शिव्या घाला एवढा एक त्यांनी कार्यक्रम आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हातामध्ये घेतलेला आहे. माझी खात्री आहे की, हे लोकांना आवडायचं नाही आणि ते आम्हाला पसंत नाही. हे जर सांगायचं असेल तर उद्या मतदानाच्या दिवशी त्याठिकाणी जी खूण आहे सुप्रिया सुळेंची. या खूणेचा उल्लेख याठिकाणी केला. ‘तुतारी वाजवणारा मनुष्य’ समोरचं बटण दाबून आणि मतांचा विक्रम करून त्यांना विजयी करणं आणि मोदी साहेबांच्या धोरणाचा पराभव करणं हे महत्त्वाचं काम तुम्ही कराल, अशी अपेक्षा करतो. इथले काही प्रश्न हे मांडले गेले, त्यामध्ये आम्ही लोक लक्ष घालू. मी स्वत: खासदार आहे, मी एवढंच सांगतो की तुम्ही याठिकाणी संग्राम थोपटे यांच्या पाठिशी तुमची शक्ती उद्या विधानसभेला उभी करा, सुप्रियाच्या मागं तुम्ही लोकसभेसाठी शक्ती उभी करा, आम्हा लोकांची जी शक्ती आहे, आम्हा लोकांचा जो संपर्क आहे दिल्लीमध्ये, प्रशासनामध्ये, आम्हा लोकांची जी काही किंमत आहे, प्रतिष्ठा आहे, ती पूर्णपणाने या दोघांच्या पाठिशी उभं करणं हे माझं कर्तव्य राहिल, ते केलं जाईल एवढंच सांगतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles