धुळे: bribe BDO… सेवा निवृत्तीला अवघे दोन तास शिल्लक असताना पाच हजारांची लाच स्वीकारताना येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे व सहायक लेखाधिकारी चुनीलाल देवरे यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले.
शिरपूर पंचायत समितींतर्गत हाडाखेड (ता. शिरपूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांनी घराच्या दुरुस्तीसाठी भविष्यनिर्वाह निधीच्या जमा रकमेतून पाच लाख रुपये अग्रीम मिळण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. शिंदे यांची भेट घेऊन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केली. शिंदे यांनी पाच हजार रुपये दिल्यानंतरच मंजुरी मिळेल, असे सांगितले. त्यामुळे शिक्षकाने बुधवारी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागातर्फे तक्रारीची पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळले. त्यामुळे गुरुवारी पंचायत समितीच्या आवारात सापळा रचण्यात आला.