Monday, May 20, 2024

खासदार छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपणार… निरोपाच्या भाषणात म्हणाले…. video

chatrapati-sambhaji-raje खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने सभागृहात त्यांनी निरोपाचे भाषण केले. छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त केंद्र शासनाने देश पातळीवर विविध कार्यक्रम राबवावेत , अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
खा.छत्रपती संभाजीराजे म्हणाले की,
“राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या राज्यसभेच्या सर्वात तरुण सदस्यांपैकी मी एक होतो. राज्यसभा सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यासाठी मला योग्य समजल्याबद्दल मी तत्कालीन राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी तसेच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो. राज्यसभेतील या कार्यकालामुळे मला एक खरा विद्यार्थी म्हणून संसदीय लोकशाहीची गुंतागुंत जाणून घेण्याची भरपूर संधी मिळाली.

संसदीय लोकशाहीची मूलतत्त्वे समजून घेताना, मी सभागृहातील सर्वात भाग्यवान सदस्यांपैकी एक होतो ज्यांना सर्व पक्षीय सदस्यांकडून प्रोत्साहन मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या तत्त्वांचे खऱ्या अर्थाने पालन करून वंचित, सामाजिक, शैक्षणिक, आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाचे, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये ३५ टक्क्यांइतक्या असणाऱ्या मराठा समाजाचाही समावेश होतो, त्यांचे प्रश्न मांडण्याच्या संधीचा नेहमीच उपयोग केला.

सभागृहाचा सदस्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचे संरक्षण, जतन व विकास यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मला खात्री आहे की माझा कार्यकाळ संपल्यानंतरही, देशाच्या सांस्कृतिक वारशाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जे मुद्दे या सभागृहात उपस्थित केले जातील ते सरकार अनुकूलपणे हाताळेल.

छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आणि कार्य जगभर पोहोचावे, यासाठी २०१८ साली मी राजधानी दिल्ली येथे भव्य शिवजयंतीचे आयोजन केले होते. या सोहळ्याला माननीय राष्ट्रपती श्री रामनाथ कोवींद जी हे सेनादलांच्या प्रमुखांसह उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड या राजधानीच्या किल्ल्याचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाचा मी अध्यक्षही आहे. मी माननीय राष्ट्रपतींना किल्ले रायगडला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते, ते त्यांनी आपल्या कुटुंबासह नम्रपणे स्वीकारले. माझ्या संसदीय कार्यकाळात मी या दोन कार्यक्रमांवर यशस्वीपणे काम करू शकलो, याचा मला नितांत अभिमान आहे.

संसदीय कारकिर्दीतील माझे पहिले भाषण छत्रपती शाहू महाराजांच्या धर्मनिरपेक्ष धोरणांवर बोलून मी सुरू केले होते आणि आजही छत्रपती शाहू महाराजांवरच निरोपाच्या भाषणाचा समारोप करणार आहे.

माझे पूर्वज राजर्षी छत्रपती शाहू महाराज; जे राजा असूनही ऋषीप्रमाणे जीवन जगले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ असे संबोधले होते.याच संसदेच्या संकुलात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. ६ मे २०२२ रोजी छत्रपती शाहू महाराज यांची स्मृतीशताब्दी आहे. सामाजिक लोकशाहीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी, मी तुमच्यामार्फत सरकारला विनंती करतो की महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त सरकारने देशव्यापी कार्यक्रम आखले पाहिजेत.

माझ्या पूर्वजांनी नेहमीच समाजातील अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले. छत्रपती घराण्याचा हा वारसा मला पुढे चालवायचा आहे.

सभागृहामध्ये वेळोवेळी प्रश्न मांडण्यासाठी मला नेहमीच संधी दिल्याबद्दल आदरणीय सभापती महोदयांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो !”

Watch Video
https://fb.watch/c657BH5yn_/

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles