पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले,अजितदादांना सांगत होतो….

0
55

शिर्डी -पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नवसंकल्प शिबिरात ते बोलत होते. धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नवसंकल्प शिबिरातील भाषणात धनंजय मुंडे म्हणाले की, मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करत आहेत. बीड जिल्ह्याची जबाबदारी आता तुमच्यावर आली आहे. फक्त बीड नाही तर अख्ख्या मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडला आहे. आम्ही शिव-शाहू-फुले यांच्या विचारांचे आहोत का? असे प्रश्न आम्हाला विचारले जातात. आपला एकमेव पक्ष आहे जो शिव-शाहू-फुलेंच्या विचाराने चालतो, असे त्यांनी म्हटले.

23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटेचा शपथविधी पार पडला होता. अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. या घटनेवरून धनंजय मुंडे म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे. पाया पडलो पण दादा म्हणाले, काही होत नाही. सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत. तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरु झालं, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला. याबाबत माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, एकंदर सद्यस्थिती पाहता, मी स्वत: अजितदादांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दादांनी द्यावी. पुण्याचा जसा विकास झाला तसा दादांकडे उपमुख्यमंत्रिपद असल्यामुळे बीडचाही विकास होईल. बीडची आता जी परिस्थिती आहे, त्यात आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे. दादांकडे द्यायला पाहिजे. सद्यपरिस्थितीत काय निर्णय घ्यायला पाहिजे हे लक्षात घेऊन मी पक्षाला विनंती केली की जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दादांना द्यावी, असे त्यांनी म्हटले.