नगरमध्ये मौज – मजा व नशेसाठी रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटले, गर्लफ्रेंडला गिफ्ट दिले ४५ हजारांचे घड्याळ

0
35

अहमदनगर – मौज – मजा व नशा करण्यासाठी तसेच गर्लफ्रेंडला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी नगर मध्ये रात्रीच्या वेळी प्रवाशांना मारहाण करत लुटणारी टोळी कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या टोळीतील एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बबल्या ऊर्फ अनिकेत शंकर वाकळे (वय २३, रा. काटवण खंडोबा, महात्मा फुले वसाहत,नगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार सुरज ऊर्फ राजु केदारे (रा. बोल्हेगांव) हा फरार आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील अनिल गोरख हाडे हा तरुण दि. १४ जुलै रोजी रात्री ११.३० च्या सुमारास शहरातील पुणे बस स्टॅण्डच्या बाहेर रस्त्यावर बीड कडे जाणारे गाडीची वाट पहात असताना काळया रंगाचे स्प्लेंडर मोटार सायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना बळजबरीने मोटारसायकलवर बसवुन जामखेड रोडवर आर्मी एरीयामध्ये नेवुन त्यास जबर मारहाण करुन त्याचे मोबाईल, पॅन कार्ड, आधारकार्ड, एटीम कार्ड व खिशातील ९०० रुपये काढून घेतले.

त्यास मारहाण करत एटीएमचा पासवर्ड घेवुन नंतर त्यातील १ लाख ४४ हजार रुपये खात्यातून काढुन घेतले असल्याची फिर्याद हाडे याने रविवारी (दि.२१) कोतवाली पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून अज्ञात दोघांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४० (३), ३०९ (६), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास सुरु केल्यावर पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय माहीती मिळाली की, सदर गुन्हा हा बबल्या ऊर्फ अनिकेत शंकर वाकळे व त्याचा साथीदार यांनीच केला आहे. व गुन्हा केल्या नंतर त्यातील एक पसार झालेला आहे, अशी माहिती मिळताच पो.नि. दराडे यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, विशाल दळवी, सलीम शेख, अविनाश वाकचौरे, अमोल गाढे, सतिष शिंदे यांना तात्काळ काटवण खंडोबा येथे आरोपीचा शोध घेण्या साठी पाठविले.

या पथकाने बबल्या ऊर्फ अनिकेत शंकर वाकळे याला ताब्यात घेवुन त्याचे कडे सदर गुन्ह्याबाबत अधिक सखोल चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा मी व सुरज ऊर्फ राजु केदारे याने नशा करुन मौजमजा करण्यासाठी व गर्लफ्रेंडला महागडया भेटवस्तु देण्यासाठी मिळुन केला आहे. अशी कबुली दिली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शितल मुगडे हया करित आहेत.

लुटीच्या पैशातून गर्लफ्रेंडला गिफ्ट दिले ४५ हजारांचे घड्याळ

अनिल हाडे यास या दोघांनी पोलिस असल्याची बतावणी करून बळजबरीने मोटारसायकलवर बसवून नेले होते. त्याला बेदम मारहाण करून त्याच्या कडील वस्तू घेतल्या नंतर एटीएम मधून काही रक्कम दोघांनी काढली. दुसऱ्या दिवशी कापड बाजारात २-३ दुकानात एटीएम कार्ड स्वाईप करून महागडे कपडे घेतले. इतर वस्तू खरेदी केल्या. यातील फरार असलेल्या राजु केदारे याने तर लुटीच्या पैशातून गर्लफ्रेंडला ४५ हजारांचे घड्याळ गिफ्ट दिले असल्याचे समोर आले आहे.

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे पो.हे.कॉ. योगश भिंगारदिवे, पो.हे.कॉ. गणेश धोत्रे, पो.ना. अविनाश वाकचौरे, पो.ना. सलीम शेख, पो.कॉ. अभय कदम, पो.कॉ.अमोल गाडे, पो.कॉ. सतिष शिंदे, मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.