होर्डिंग दुर्घटनेशी त्यांचा संबंध काय? छगन भुजबळ धावले उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी

0
26

नाशिक : मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्यानंतर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आता या दुर्घटनेवरून राजकारण सुरु झालं आहे. भाजप नेते राम कदम यांनी या अनधिकृत होर्डिंगचे मालक भावेश भिडे यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो ट्विट करत निशाणा साधला आहे. राम कदम यांनी फोटो ट्विट केल्यानंतर या दुर्घटनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याचदरम्यान, राम कदम यांच्या आरोपावर मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. होर्डिंग दुर्घटनेशी उद्धव ठाकरेंचा संबंध काय? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच यावेळी त्यांनी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरून सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपावर भाष्य केलं. मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेवर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, ‘या घटनेत दुर्देवी मृत्यू झाले आहेत. विमानतळाकडे जाताना असे अनेक होर्डिंग दिसतात. या होर्डिंगचे वजन भरपूर असते. होर्डिंग अनधिकृत आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. बेकायदेशीर आहे , मग वेळ कशाला काढता? याबाबत सर्वच संस्थांनी काळजी घेतली पाहिजे’.

‘रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय, शासन ५ लाख देईल म्हणजे संपलं का? जितका आकार असायला हवा होता, त्या पेक्षा मोठा आकार त्याचा होता. या घटनेची चौकशी करा, असे ते पुढे म्हणाले.

भाजपने आरोप केल्यानंतर भुजबळ म्हणाले, ‘सरकार आमचं आहे. महानगर पालिका सुद्धा सध्या आमचीच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा काय संबंध आहे? असे अनेक लोक असतात. हे व्यापारी लोक सगळ्यांकडे येतात. मिठाई घेऊन येतात आणि फोटो काढतात. यात राजकारण आणण्यााच प्रयत्न करू नये’.