काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे खडसेंच्या भाजप प्रवेशाविषयी मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी मिश्किल टिप्पणी करत प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, ‘एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांचे निरोप भरपूर येत आहेत. पण मला त्या संदर्भात काही माहीत नाही. त्यांचे फार प्रयत्न चालू आहेत. जोर लावून त्यांचे प्रयत्न चालू असल्याचं मला कळतयं. दिल्लीकडूनही कळालं आणि राज्याकडूनही कळाले आहे. पण मला याबाबतीत अजून काही विचारणा झालेली नाही आणि तसं काही प्रयोजन मला तरी दिसत नाही.
मला विचारायचं म्हटलं तर मला अजून कोणीही विचारलेलं नाही. त्यांना घ्यायचं न घ्यायचं याबाबत मला विचारलेल नाही. कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. वरुन जर त्यांची काही लाईन असेल हॉटलाईन तर त्यांनी लावावी. चांगलं आहे वरुन जर सिग्नल मिळाला तर’, अशा शब्दात महाजन यांनी मिश्किल टिप्पणी करत खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.






