धक्कादायक! ज्या शाळेत ज्ञानाचे धडे दिले तिथेच घेतला टोकाचा निर्णय; शिक्षकाने….

0
177

जालना: शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबड तालुक्यातील मठ तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. केरुबा दिगंबर घोडके (५०) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. मयताने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केरूबा दिगंबर घोडके मठ तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. दुपारी साडेबारा वाजेच्या मधल्या सुट्टीच्या काळात मुलांना खिचडी खाण्यासाठी सोडण्यात आले. मुले खिचडी करण्यास घरी गेले असता शिक्षक केरूबा घोडके यांनी शाळेतील वर्गात लोखंडी अँगलला झेंड्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुले दुपारची खिचडी खाऊन परत शाळेत आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. गावकऱ्यांनी ही घटना गोंदी पोलीस स्टेशनला कळविली. त्यानंतर पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. ३५ विद्यार्थी असलेल्या या शाळेत दोन शिक्षक होते. दुसरे शिक्षक कैलास जाधव हे केंद्र शाळेवर झिरपी येथे प्रशिक्षणासाठी गेलेले असल्याचे सांगण्यात आले. केरूबा घोडके हे पाचोड येथे वास्तव्यास होते.