राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील यांचे भाचे आणि राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की, नेमकी चर्चा काय सुरू आहे? जयंत पाटील एकटे जाणार की “सगेसोयरे” यांना घेऊन जाणार असा प्रति प्रश्न पत्रकारांना केला आहे. जयंत पाटील यांनी या चर्चांचे खंडन केलं आहे असं देखील ते म्हणाले. आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत आणि भविष्यात देखील राहणार आहोत, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे. भाजप म्हणत की येऊ घातलेल्या निवडणुकीत आम्ही सर्वाधिक जागा जिंकू तर त्यांचे मूळ भाजपचे किती लोक आहेत हे त्यांनी सांगावं. आमच्याकडून त्यांच्याकडे गेलेले किती लोक आहेत, हेही सांगावं असा टोला प्राजक्त तनपुरे यांनी लगावला आहे.
अहमदनगरला मिरी येथील तिसगाव प्रादेशिक योजनेचे संथ गतीने सुरु असल्याच्या कामावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे चांगलेच आक्रमक झाले. सरकार जल जीवन मिशन योजनेचा गाजावाजा करताय मात्र हर हर जल ही वस्तुस्थिती नसून ग्रामीन भागातील जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप तनपुरे यांनी केलाय. याबाबत विधानसभेत लक्षवेधी करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही योजना म्हणजे घर घर जल हे चुकीचं आहे. तसेच गावागावांमध्ये झालेला सर्वे चुकीचा असल्याच देखील तनपुरे यांनी म्हटलं आहे. ही थातूरमातूर योजना असून याचा देशात गाजावाजा केला जातोय अशी टीका तनपुरे यांनी केली आहे.