सरकारी रूग्णालयांमध्ये मृत्युचे तांडव…सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत .. बाकी महाराष्ट्र आजारी

0
33

नांदेड मध्येही अतिशय धक्कादायक घटना घडली. तेथील शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. यावरून सुरू झालेला गदारोळ शांत होतो न होतो तोच नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही अशीच घटना घडली. तेथे मागच्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही या मुद्यावरून सरकारवर कडाडून टीका केली. तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय ? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही टीका करत शासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.. नांदेडमधील सरकारी रुग्णालयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली होती. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत.

तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत आहेत, ते सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे, हे दुर्दैव आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं, असा सल्लाही राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.