कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड एमआयडीसी प्रकरणात सुरु असलेल्या राजकारणामुळे 10 जुलै पासून विधिमंडळाच्या आवारात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र देखील दिला होता मात्र आता या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याने रोहित पवार यांनी उपोषणाचा निर्णय दोन दिवस तात्पुरता स्थगित केला असल्याची माहिती दिली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटले आहे की, MIDC हा कर्जत-जामखेड मतदारसंघातील लाखो युवांच्या भविष्याचा प्रश्न आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही अधिसूचना काढण्याबाबत सरकार दिरंगाई करत असून दोन-अडीच वर्षे केवळ राजकारण सुरुय. लोकशाहीच्या पवित्र मंदिर असलेल्या विधिमंडळातही सरकारकडून धडधडीत खोटी आश्वासनं दिली जातात.
त्यामुळं नाईलाजाने उद्यापासून (बुधवार) विधिमंडळाच्या आवारात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता आणि तसं पत्रही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उद्योगमंत्री उदय सामंत साहेब आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांना दिलं. परंतु याबाबत मुख्यमंत्री महोदयांची उद्योगमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली आणि निर्णय घेण्याबाबत दोन दिवस वेळ देण्याची मागणी त्यांनी केल्याने उपोषणाचा निर्णय दोन दिवस तात्पुरता स्थगित केला. परंतु दोन दिवसांत अधिसूचना न काढल्यास युवांच्या भविष्यासाठी गुरुवारी विधिमंडळाच्या आवारात उपोषण केलं जाईल.