शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगालाच धारेवर धरलं. निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढत असतं का? शिक्षकांऐवजी आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई करायला हवी, असं राज ठाकरे म्हणाले. शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आली. यावेळी शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी कुठेही निवडणूक कार्यक्रमाला रुजू होऊ नये, मुलांकडे लक्ष द्यावं, कोण काय कारवाई करतं, त्याकडे मी पाहतो, असं राज म्हणाले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी काम करण्याचे आदेेश देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४ हजार १३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यात आलं आहे. एवढं काय काम असतं? निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतं?
दर वर्षी निवडणूक आल्यावर घाई गडबडीत का कामं करुन घेतली जातात? हजर न होणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. उलट निवडणूक आयोगावर पाच वर्ष काही काम न केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असं राज ठाकरे म्हणाले.