महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद प्रकल्प गुजरातला जाणार यावरून सध्या राजकारणाला उकळी फुटली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी हे का घडलं याबाबत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी हे सर्व घडण्यामागचं गुपित उघड करत राधाकृष्ण विखे पाटलांना उत्तर देण्याचे आवाहन केले आहे. आपल्या म्हेव्हण्याचा लाड पुरवण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे. राजेश नामदेवराव परजणे हे मंत्रालयात बसून महानंदचा कारभार पाहत असल्याचेही राऊतांनी म्हटले आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघावर (महानंद) शासनाचे संचालक मंडळ होते. शासनाचे दुग्ध मंत्री चेअरमन होते व दुग्ध खात्याचे राज्यमंत्री व्हाईस चेअरमन होते त्यावेळी आठ लाख लिटर दूध विक्री होती. तसेच अतिशय चांगल्या प्रकारे त्याचे कार्य सुरू होते असेही राऊतांनी म्हटले आहे.
https://x.com/rautsanjay61/status/1742778674401935438?s=20
लोकनियुक्त संचालक मंडळ आल्यापासून चांगले चालू होते. परंतु सध्या दुग्ध मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेव्हणे राजेश नामदेवराव परजणे हे महानंदचे अध्यक्ष आहेत आणि हे आल्यापासून महानंदला उतरती कळा लागली आहे. परजणे महिन्यातून एकदा येऊन महासंघ चालवीत आहेत, महासंघाकडे दुर्लक्ष केल्यामुळे महासंघाचे पॅकिंग विक्री पूर्णपणे कमी झाल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.